Y

     “Y” हा चित्रपट पाहून आठवडा झाला. आज कुठे सावरतोय आणि शब्द सुचत आहेत. सिनेमा पाहून भारावण्याचे प्रसंग बरेच झाले आहेत मात्र Y ने जे नि:शब्द केले तो अनुभव एकमेकाद्वितीय!

पुण्यातील माझ्या काही मित्रांनी हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी पाहिला. आणि मला recommend केला. अगदी उत्कृष्ट आहे, हॉलीवुड वगैरे ला टक्कर देण्यारा बनलाय वगैरे वगैरे. पण योग जुळुन आला नाही. दिग्दर्शक डॉक्टर अजित वाडीकर माझा मित्र असल्याने त्यानेही कित्तेकदा ‘ये Y दाखवतो’ असे म्हटले पण जमलच नाही. त्यामुळे उत्सुकता. आणि बघताना एक correction factor लावून पहावा असे ठरवले.

चित्रपट सुरू होताच विषयाला हात घालतो. स्त्रीभ्रूणहत्येचा विषय आधीच संवेदनशील,  सर्वव्यापी असूनही ठराविक सर्कलमध्ये चर्चिला जाणारा या विषयाला introduce करावे वगैरेची भानगड अजितने टाळली. पहिल्या दृश्यापासूनच् चित्रपट जोर धरतो. सामाजिक विषयावर कलाकृती बनवत असताना साधारणत: दिग्दर्शकाला प्रबोधनाचे फिट येतात मात्र Y मध्ये डॉक्टर अजितने यावर आधीच विजय मिळालेला दिसतो. प्रेक्षकांना शिकवण न देता ‘जे आहे ते असं आहे’ हे सांगण्याकडे अजितचा कल आहे. मग असं करतांना आपण प्रेक्षकांना मनोरंजना पासून दूर तर नेत नाही ना याची काळजी देखील तो घेतो. Hyperlink format चा वापर करत दृश्यांची सरमिसळ चांगली जमली आहे. काही दृश्यांमध्ये Babel आणि Memento ची आठवण होते. पात्रांचे संवाद देखील चपखल बनले आहेत. मग ते पेशंट कंपाउंडर मधील तरल संवाद असोत अथवा डॉक्टर पुरुषोत्तमच्या तोंडची दमदार वाक्ये असोत सर्व प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात. संपूर्ण चित्रपटात कोठेही सिनेमाची प्रेक्षकांच्या मनावरची पकड निसटत नाही. चित्रपटाचे संकलन उत्कृष्ट जमले आहे. पार्श्वसंगीताचा वापर पडद्यावरचा विषय अधिक गहरा करणारा झाला आहे. तांत्रिक दृष्ट्या (देखील) हा सिनेमा उच्च दर्जाचा बनला आहे. कलाकारांविषयी सांगायचे झाले तर सर्वच मस्त जुळून आले आहे. मुक्ता बर्वे, सुहास शिरवळकर, ओमकार गोवर्धन, प्राजक्ता माळी, संदीप पाठक सर्वांचे दमदार परफॉर्मन्स आहेत. मुक्ता बर्वेने साकारलेली डॉक्टर आरती देशमुख ही खरोखरची सरकारी नोकरीच्या कचाट्यात सापडलेली डॉक्टर वाटते. पण नंदू माधव यांनी साकारलेला डॉक्टर पुरुषोत्तम अंगावर येतो. मोजकी वाक्य आणि त्यातून येणारा त्यांचा aura खलनायकी भूमिकेतले सर्वच मापदंड उंचावणारा झाला आहे. अजितला जेव्हा त्यांच्या भूमिकेबद्दल विचारले तेव्हा तो म्हणतो ‘पडद्यावर नसतानाही कथेत सतत भास होणारा प्रभाव होता तो सरांनी अगदी बरोबर दिला आहे’.

अजित च्यामूवी प्लांनिंग चे एक चित्र
अजित च्यामूवी प्लांनिंग चे एक चित्र


    चित्रपट सुरू झाल्यापासून मी बारकाईने पाहत होतो. या काल्पनिक कथेत वापरलेल्या गाड्यांची MH 74 ची नंबर प्लेट, एकाच दृश्यात हायपरलिंक फॉरमॅटमध्ये दाखवताना दोनच्या जागी चार वेळा दिलेली दरवाजावरची
थाप(*) अशा अनेक खाचाखोचांबद्दल जेव्हा अजित सोबत चारचा केली   तेव्हा त्याने विचारपूर्वक केलेल्या दिग्दर्शक दिग्दर्शनाची चमक कळली. (*याबद्दल अजुन लिहावे  वाटते आहे मात्र स्पॉयलर ठरू नये म्हणून टाळतो)

डॉक्टर अजितचा हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत एक cult film ठरावी हे निश्चित. अजित ने सिनेमाचा घेतलेला ध्यास Y च्या कणाकणात दिसतो. मग त्याने दिलेले Y हे नाव असो, कथानकाची उकल असो, सेट निवड वा अगदी पात्रांची नावे असो. सर्वच विचारपूर्वक असल्याने Y आपले everlasting impression पाडण्यात यशस्वी ठरतो. प्रत्येक चांगली कलाकृती उत्तरांपेक्षा अधिक प्रश्न समोर आणते आणि Y तेच करते. डॉक्टर अजित  तुझ्या या कलाकृतीने अनेक भाषात आपले रूपांतरण करावे आणि समाजातील सर्वांनी या विषयावर जागृत करावी ही सदिच्छा देतो. 


"माऊली, समोर चला!"


आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो किंवा for that matter कोणत्याही श्रद्धा स्थानाला भेट देतो. मग ते चर्च असो, मसजीद, गिरिजाघर अगदी काहीही असो, भक्ताची काय अपेक्षा असते? 2-4 ठळक गोष्टी असतात. एक, आपल्याला आपल्या प्रार्थना शांतचित्ताने करता याव्यात. दोन, रोजच्या ज्याच्या त्याच्या जीवनातील कच-कच, मच-मच आणि कट-कट यांपासून क्षणभर विश्रांती मिळून आपला संपर्क त्या सर्वोच्च शक्ती सोबत होण्याकरिता पूरक वातावरण मिळावे. तीन, आपला भक्तिमार्ग आणि आपल्यासोबत आलेल्या इतर भक्तांचा मार्ग यात चढाओढ नसावी. ते होऊ नये आणि आजच्या करोनानूभावाच्या काळात एक नवीन गोष्टीचा समावेश म्हणजे श्रद्धा स्थानाची भेट कोविड अप्रोप्रिएट एन्व्हायरमेंट मध्ये व्हावी. काल मी सपत्नीक श्री क्षेत्र शेगाव येथे श्री गजानन महाराज मंदिराला भेट दिली आणि ठामपणे वरील सर्व गोष्टींच्यासमोर बरोबरची खूकरू शकतो.

महाराजांचे दर्शन करोना संक्रमणाचे कारण होऊ नये म्हणून ट्रस्टने दर्शनासाठी मोफत ऑनलाइन पासची व्यवस्था सक्ती केलेली आहे. तो मिळवायचा असेल तर आधार कार्ड, मोबाईल इत्यादी माहिती भरून वेळेचा स्लॉट नक्की करता येतो. यामुळे एकूण क्त संख्या, दर तासाला दिले जाणारे प्रवेश, महाप्रसादाचे नियोजन यांवर नियंत्रण ठेवता येते. तसेच शासनाच्या नियमावलीचे पालन करण्यासाठी मदतच होते.  ऐनवेळेस e-पास ची प्रिंट घेऊ शकलो नव्हतो तेव्हा काही अडचण तर होणार नाही अशी भीती होती. मात्र प्रवेशद्वाराच्या सेवाधारकाच्या वागणुकीत काहीही बदल झाला नाही. त्याने आमचे क्रेडन्शियल्स फोनच्या स्क्रीनवर तपासले आणि आमचा प्रवेश सीमलेस झाला.


परदेशात एका संशोधनात असे उघड झाल्याचे आठवते की कोणत्याही ठिकाणाची पहिले पाच मिनिटे दोनशेहून अधिक मोमेंट्स ऑफ ट्रूथ साठी कारणीभूत ठरतात.  मंदिराचा परिसर यास अपवाद नव्हता. आत शिरल्या शिरल्या आपण एका शिस्तबद्ध वातावरणात प्रवेश करत आहोत याचा अनुभव आला. शिरताना निर्जंतुकीकरण पॉईंटवर सेवाधारी प्रत्येक भक्ताच्या हातांचे निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचा वापर करत होता. त्या पॉईंटनंतर ६ फुटांचं अंतर असावं. अशी रांग पुढे जावी यासाठी अॅरोने  दिशादर्शन देखील केले होते. मोठ्या आवारातून पुढे सरकत असताना मला जाणवले आपण चप्पल काढलीच नाही. तसं मंदिर, गाभारा दृष्टीक्षेपात वगैरे नव्हता पण आपण मंदिरात आलोय, आवारात मंद आवाजात स्पीकरवर मंत्रोच्चार सुरू आहे आणि आपण रांगेत आहोत आणि त्याच वेळेस पायात चपला पण आहेत काहीतरी चुकतंय असं वाटत होतं आयताकृती रांगेत पटापट सरकणार्या इतर भक्तांच्या पायांकडे पाहिले तर कोणी चपला घातल्या कोणी नाही त्यामुळे अधिकच बुचकळ्यात पडलो मग हॉलच्या चेक पॉईंट च्या पल्याड असलेल्या लोखंडी रॅक कडे लक्ष गेले आणि कुमकले ही तेथे चपला स्टँड असावी चेक पॉईंट कडे वळणावर सेवादार याने परत हातांना निर्जंतुक केले त्यात कुणाला समाधान झाले नसेल तर ऑटोमॅटिक डिस्पेंसर पण लावले होते चेक पॉईंटवर दोन तीन खिडक्या होत्या प्रत्येक खिडकी एक स्वतंत्र केबिन होती पलीकडचा सेवाधारी तुम्हाला पास नंबर विचारून तुमच्या प्रवेशाची खात्री करून घेत होता यानंतर जमिनीवरचे अॅरोजने आम्हाला चपला स्टॅन्ड पर्यंत नेले तेथे चपला ठेवल्यावर सेवादार याने रकान्याचा नंबर लक्षात ठेवण्यास सांगितले पुढे मंदिराकडे जाताना हात पाय धुण्यासाठी एक जागा केली आहे. तेथे 7-8 नळांतून पाण्याची संतक बारीक धार पडत असते. तिथे जातांना सेवाधारी परत भेटतो या खेपेला आपल्या हातावर साबणाच्या पाण्याचा फवारा मारतो. आपण स्वच्छ झाल्यावर मग आपण महाराजांच्या दर्शनासाठी समोर होतो. “माऊली समोर चला” अशी विनंती दर दहा पंधरा मीटर उभा सेवाधारी करत असतोच. आणि हो, जमिनीवर उभे राहण्याची चौकट खूण आहेतच. भक्त संख्या मर्यादित असल्याने रांग मोठी नव्हती आणि आमची मूवमेन्ट देखील भराभर होती.  असे आम्ही महाराजांच्या समोर गाभाऱ्यात पोहोचलो. दुपारचा मंद सुवास, स्पोटलेस स्वच्छता, आजुबाजूला मोजके लोक यामुळे दर्शन अगदी स्वर्गीय ठरले. या दर्शनासाठी खडतर आम्ही खूप वेळ प्रवास करून आलेलो पण देवाचिये द्वारी उभा क्षणभरी नामदेवाच्या या उक्तीप्रमाणे मुक्ती चारी साधियेले’  ही स्थिती क्षणार्धात होते. “माऊली समोर चला” या ऊक्ति कानावर पडत असतातच.

गाभाऱ्यातून समोर आपण महाप्रसादाचा कडे जातो. जागोजागी दिशादर्शनासाठी पाट्या आणि सेवाधारी उभे असल्याने चुकायचा प्रश्नच नाही. महाप्रसाद हॉल १ कडे निघालो.  सेवाधाऱ्याने हातांवर साबणाचा वर्षाव केला आणि ‘बेसिन मध्ये हात झटका’ असेही सांगितले. बारीक पाण्याची धार तिथेही होती. मग हॉलमध्ये जमिनीच्या एका चौकटीतून दुसऱ्या चौकटीत जात आम्ही ताटांजवळ पोहोचलो. पलीकडची सेवाधारी व्यक्ती मास्क आणि ग्लोज घालून होती. ताट हातात घेतले. चपलांना हात लावला होता नंतर थेट ताटालाच! मध्ये चार वेळा सॅनिटायझर आणि दोन वेळा हात धुतलेले!! मध्ये कशालाही स्पर्श करायची गरजच नव्हती!!!

 महाप्रसाद म्हणजे भोजन.  त्यामध्ये वरण,पिठले,फळ भाजी, भात, मसाला भात, पोळ्या आणि बुंदीचे लाडू. बसण्यासाठी ठराविक जागा. बेंच सारखं स्टील स्ट्रक्चर.  त्यावर तीन जणांना बसण्याची सोय. आजूबाजूच्या जागांवर फूल्या आणि केवळ मधल्याच जागेवर बसण्यासाठी सुचवलेले. अशा शिस्तबद्ध पद्धतीत आम्ही नवरा बायको जवळ जवळच्या दोन बेंचवर दूर-दूर बसलो. बेंचवर पाण्याचा पेला सांडू नये म्हणून त्यासाठी गोल छिद्र करत त्याला खालून सपोर्ट देत सोय केली होती. मधून मधून मास्क ग्लोधारी सेवाधारी काय हवं, काय नको यासाठी विचारपूस करत होती. महाप्रसाद ताटात ठेवू नये या सूचना जागोजागी लिहिलेल्या आहेत. महाप्रसाद अगदी घरच्यासारखा पोट भरून तृप्त झाले. संपताच आपापले ताट ठराविक ठिकाणी ठेवून आम्ही पाय-चलित नळाच्या बेसिन जवळ पोहोचलो. रस्त्यात सेवाधाऱ्याने साबण दिलाच होता. हात धूऊन आम्ही रांगेत बाहेरच्या दिशेने निघालो. रवी महाराजांच्या पादुकांजवळ ध्यानासाठी भक्त बसायचे, कोरोना काळानंतर ते कक्ष बंद केले गेले.  आता ‘निर्गमन’ पथावर चौकटीत खुर्च्या ठेवून व्यवस्था आहे. तिथे तीन-चार देणगी खिडक्या होत्या त्या प्रत्येक कक्षातला सेवाधारी माइक स्पीकर च्या साह्याने संभाषण करत होता. मी देणगी दिल्यावर त्याने पत्ता विचारला. मी दिल्ली सांगितले आणि पावतीची वाट पाहत होतो. पण त्याने विचारले महाराष्ट्राचा पत्ता नाही का? कंप्यूटर दिल्ली घेत नाहीये. मी चमकलो आणि मग महाराष्ट्रातला पत्ता दिला.

 समोर चपला स्टँड जवळून चपला घेतल्यावर हात धुण्यासाठी बारीक धार होती. जवळच वाड्मय विभागाचा फलक पाहिला. तेथून सौ.नी विजय ग्रंथ आणि प्रार्थना स्तोत्र घेतली. विशेष म्हणजे त्याची किंमत स्वेच्छेने द्यावयाचे होती.

 आम्ही मग संतुष्ट  मनाने बाहेरच्या मार्गाकडे वळलो. सेवाधारी, पायांजवळची चौकट आणि पाट्या सोबतीला होत्या. मग जाणवले अरे, सेल्फी तर राहिलाच मग खिशातून फोन काढून फोटो काढला. “माऊली पुढे चला फोटो काढू नका” सेवाधारी बोलला. आजच्या सामाजिक मनाला सेल्फी पॉइंट मंदिरातही हवा असतो, नाही का? आनंदी अनुभव आणि शिस्तबद्ध सुटसुटीत कारभार यामुळे हे दर्शन विशेष ठरले. आधी मी दोन वर्षांपूर्वी दर्शनासाठी आलो होतो. तेव्हा शिस्त होती,सेवाधारी यांचे समर्पण होते, मात्र यावेळी ते अधिकच जाणवले. सेवाधाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेला सलाम! कदाचित त्यामुळेच का काय माझा असा विश्वास आहे की इथे येणाऱ्या भक्तांपैकी 90 टक्के तरी रिपीटर असावे.

मी देव देव करणारा आहे अशी माझी ओळख नाही. पण मला ओळखणाऱ्यांना  माहित आहे की मी believer आहे म्हणजे मानवाच्या आकलना पलीकडच्या शक्तीमध्ये विश्वास असणाऱ्यांपैकी एक ! त्या शक्तीशी एकरूप होताना जी चित्त शांतता हवी ती श्री क्षेत्र शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या मंदिरात मिळाली. 

अमित भोळे 


(सदर लेख दैनिक हिंदुस्तान च्या अमरावती आवृत्तीत दि. १६ नोव्हेंबर , २०२१ रोजी प्रकाशित झाला.) 



 


दिल्लीतील दिवाळी (महाराष्ट्र टाइम्स 7 नोव्हेंबर, 2020, मुंबई )

दिल्लीतील दिवाळी

दिवाळी हा वर्षातला महत्त्वाचा सण. काही वर्षांपूर्वी दिवाळी च्या आसपासच नोकरीनिमित्त दिल्लीला स्थायिक झालो. हवा, पाण्याबरोबरच शहरातील रीतीरिवाजही सांस्कृतिक धक्का (culture shock) देणारे होते. माझ्यासारख्या सामान्य मराठी माणसाला दिल्लीतील प्रत्येक गोष्ट अजब भासायला लागली होती.

 

दिवाळी म्हटले म्हणजे नोकरदार माणसाला सुट्ट्यांचा विशेष अप्रूप असतं.  मग ती ऑफिसला सुट्टी असो अथवा मुलांच्या शाळेला.  आम्हाला असायची अशी काही इकडे उत्तरेला दिवाळी ची म्हणून सुट्टी नसते.  मला आठवते आमच्या कडे सहामाही संपून लगेच दिवाळी ची सुट्टी लागे.  ती पण चांगले पंधरा-वीस दिवस.  इकडे मात्र दिवाळी ला फार फार तर दोन-चार  दिवस सुट्टी असते. कारण थंडीचा मुहूर्त साधून नाताळची तशी लांबलचक सुट्टी मिळते.  त्यात गेल्या दोनेक वर्षांपासून प्रदूषण सुट्टीची देखील भर पडली आहे.

 

आपल्याकडे दिवाळी चे स्टार अट्रॅक्शन (Star Attraction ) असते ते म्हणजे फराळ! चिवडा, चकल्या, लाडू यांची खमंग चव दिवाळी चे चार दिवसच नाही तर चांगले पंधरा एक दिवस जिभेवर असते. अनेक घरी तर दिवाळी झाल्यावर सकाळचा नाश्ता म्हणून दिवाळी चा फराळसंपवला जातो. दिल्लीमध्ये ही संकल्पना नसल्यातच जमा आहे. इकडे भर असतो तो रेडिमेट मिठाईचा.  आणि (कदाचित त्यामुळेच) तो जास्त रोचक, लोभस वाटत नाही. अलीकडच्या टीव्हीवरच्या जाहिरातीपहा. मराठी चॅनल्सवर दिवाळी च्या चिवड्याची जाहिरात दिसेल पण हिंदी चॅनलवर अशी एकही जाहिरात नाही. असलीच तर दिवाळी साठी तयार मिठाची जाहिरात दिसेल.

 

दुसरा महत्वाचा फरक म्हणजे आपल्याकडे आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना दिवाळी निमित्त फराळाला बोलवतो. दिल्लीला दिवाळी निमित्त भेटवस्तू देण्याकडे कल दिसतो. यांत तयार मिठाई सोबतच येऊ घातलेल्या थंडीला अनुकुल सुकामेवा भेट देण्यातच शुभेच्छुक धन्यता मानतात.  बाजारात जर चक्कर मारली तर दुकाने यानेच भरभरून असतात. इतके की अगदी स्टेशनरी विकणारा दुकानदारही दिवाळी त सुक्‍या मेव्याचे पाकिटे विकताना दिसतो. ही पाकिटे देखील विविध प्रकारची आकर्षक रीत्या बनवलेली असतात.  यासोबतच फळे, कोल्ड ड्रिंक्स, चीप्स यांचे विविध प्रकार घेऊन यांना एकत्र करून लाकडी खोक्यात गिफ्ट स्वरूपात विकले जातात.

 


दिवाळीतील दिल्लीचा बाजारही एकदम निराळा असतो.  रोषणाईच्या नानाविध चायनीज ते लोकल चित्रविचित्र दिव्यां सोबतच ते विकणार्‍यांची ही तोबा गर्दी असते. रवी बाजारात रस्त्यात आपल्याला थांबवून मोजे विकणारा बाळू या दिवसात गळ्याभोवती रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा विकताना दिसतो. आपल्याकडच्या बाजारपेठे सोबत इकडच्या बाजारपेठेची एकरूपता शोधायची झाली तर ती दिसते नवीन कपड्यांमध्ये. दुकानांत दिवाळी निमित्त नवीन माला सोबतच नवनवीन सेल पण लागलेले असतात.

 

दुसरी समानता म्हणजे दिवाळी च्या सणाची सुरुवात. जी धनतेरस पासून होत भाई दूज पर्यंत चालते. कडे धनतेरस ला ‘छोटी दिवाली’ असे देखील म्हणतात. आपल्याकडे छोटी-मोठी दिवाळी हा कन्सेप्ट नाही. तसेही इकडे नरक चतुर्दशी विशेष मनवत नाहीत. मी एकदा नरकचतुर्दशीला माझ्या दिल्लीतल्या शेजारच्या मित्राला विचारले कि तू किती वाजता उठलास? त्याने नऊ सांगितल्यावर मी गमतीत म्हणालो “अरे हम दोनो नरक मे भी पडोसी रहेंगे” त्याचा कन्फ्युज्ड चेहरा पाहून माझा हा विनोद सपशेल आपटला ही कळले.

 

लक्ष्मीपूजनाला पत्ते खेळायची प्रथा पण उत्तरेकडची! आपल्याकडे हिंदी सिनेमा व सिरियल मुळे तिला ही उचल मिळाली आहे म्हणे!! आपल्याकडे पावा म्हणजे बलिप्रतिपदा हा सण सौभाग्यवतीसाठी महत्त्वाचा मानला जातो.  सांस्कृतिक महत्वासोबतच प्रमुख आकर्षण असते ते नवऱ्याकडून मिळणारे गिफ्ट. या प्रथेबद्दल एकदा आमच्या सौ ने एका हिंदी भाषिक मित्राच्या पत्नीला सांगितले. त्यानंतर ही गोड प्रथा त्या घरातही आनंदाने मानली जाऊ लागली. भाऊबीज ही उत्तरेत तितक्याच उत्साहात नवली जाते आणि दिवाळी ची सांगता होते. मला आठवते लहानपणी आम्ही दिवाळी तील काही फटाके तुळशी विवाहासाठी राखून ठेवत. पण इकडे ती संकल्पना नाही.

 

फटाक्यांचं विषय घेतला तर दिल्लीत गल्ली गल्ली सोबतच सारे जमून राजपथ,इंडिया गेट, कॉनॉट प्लेस इथे फटाके फोडत. अगदी मुंबईत मरीन ड्राइव्हवर करतात तसे. मात्र गेल्या दोनेक वर्षांपासून प्रदूषणावर बंदी म्हणून हे प्रमाण शून्यावर आले आहे. त्यामुळे माझ्यासारख्याला आकाशातली आतिषबाजीला मुकावे लागले आहे. यंदा तर दिवाळी अधिकच निराळी होणार आहे. मुळातच कोरोनाने बंधने घातली आहेत. त्यात कोणाकडे येणे-जाणे पण होणार नाही. त्यामुळे दिवाळी नेहमीसारखे नसेल- अगदी महाराष्ट्रात आणि दिल्लीत देखील. तरीही हा सण सर्वांसाठी इतका आनंदाचा असतो की यंदाचे अपवादात्मक वर्ष विसरून पुढच्या वर्षीचे कॅलेंडर आले की आपण दरवर्षी प्रमाणे दिवाळी कधी येणार हे सर्वप्रथम पाहू आणि आपले प्लॅन्स बनवू ही नक्की !

(सदर लेख महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीत 7 नोव्हेंबर 2020 ला प्रकाशित झाला )

 


Latest Post

Y

       “Y” हा चित्रपट पाहून आठवडा झाला. आज कुठे सावरतोय आणि शब्द सुचत आहेत. सिनेमा पाहून भारावण्याचे प्रसंग बरेच झाले आहेत मात्र Y ने जे नि:...