किती छान झालं असतं जर देवालाही RTI मधे प्रश्न विचारता आले असते? "मीच का","असं माझ्यासोबतचं का होतं?" अशा वैश्विक प्रश्नांना काहीतरी दिशा मिळू शकली असती. हल्ली निव्वळ एका कागदाच्या आधारावर सोबत दहा रुपयाचा धनादेश जोडून सामान्य माणसाला जे हत्यार RTI Act ने दिले आहे त्याची महिमा कही औरच आहे. कोणी सरकारी बाबू जास्त माजला असू देत वा यंत्रणेने स्वप्नांचा चुराडा केला असूदेत किंवा नुसतचं जळखावू का कुत्सित/विक्रुत मनोव्रुत्तीने हतबल होवून कोणीही अगदी कोणीही (किंवा अनेकदा काल्पनिक कोणीही) संपूर्ण कार्यालयाला कामाला लावू शकते. आपण देवाला आणि त्याच्या दैवालाही असे आपल्यासाठी कामाला लावायला पाहिजे.
खरचं देवादरबारी RTI लागू झाला तर कित्येक रिकामी मने सक्रिय होतील. मग दहा रुपये किंवा त्याहून कमी अगदी रुपयाही चालेल देवळातल्या हुंडीत, चर्चमधल्या वा मस्जिदीतल्या दानपत्रात टाकायचा आणि मनोमन RTIची बेल वाजवायची आणि प्रश्न विचारायचा. Bruce Almighty मध्ये ज्याप्रमणे Bruceला देवपण प्राप्त झाल्यावर विश्वभरातून प्रार्थना E-mailमध्ये आल्या होत्या अगदी तसही काहीसं चालेल. नाही तर हल्ली नाही का सरकारी कार्यालयात RTI Cell वा पोस्ट ऑफीसात RTI Help वा संकेतस्थळावर RTI बद्दल मसूदा अशी स्वतंत्र निर्मिती झाली आहे तसं सार्वधर्मिक एखादं 'RTI प्रार्थनालय’ पण उभारणे शक्य आहे.
मग एकदा काही माहीती एखाद्या भक्ताने विचारली तर ठरावीक कालावधी नंतर या RTI केंद्रातून भक्ताला देवदरबाराचे उत्तर कळवावे. हे उत्तर अगदी वैयक्तिक माध्यमातून देण्यात येईल. जसे ’माझ्या बंड्याला बारावीत फेल का केले?’ याचे उत्तर म्हणून बंड्याच्या आईला बंड्याच्या फोनमध्ये त्याच्या गर्लफेंडचा मेसेज वाचण्याचा योग आणायचा असा ताळमेळ या RTI केंद्राकडून करण्यात यावा. मिळालेले उत्तर पाहून समाधानी नसल्यास Appellate Authority कडे अपील करता येते. मात्र देवानेच उत्तर दिल्यावर त्यानंतर कोणाकडे अपील करणार?
ज्याप्रमाणे RTI Application लिहिताना लिहिणारा मुद्देसूद नसेल तर जबाबही उडवाउडवीचाच मिळतो. देवदरबारी तर याची विशेष काळजी घ्यावी लागेल. निष्काळजीपणे देवाला काहीही विचारून हैराण केले तर तो अधिक हैराण करणारे उत्तर देईल. Boss holidayला का कामावर बोलवतो असे काही विचारले तर न जाणो देव उत्तर म्हणून 6 days week करायचा!
जसे प्रस्थापितांना जबर हादरा देवून त्यांची नशा (काही वेळ नी प्रमाणात) उतरवण्याचे काम RTI करत असेल तर देवालाही आपल्याकडे आता लक्ष द्यायची वेळ आली आहे हे सांगण्याचे काम ते करू शकते. त्याचबरोबर जबाब मागणाऱ्याचेदेखील डोळे उघडून त्याला लाईनीवर आणण्यात देव मागेपुढे पाहणार नाही.
आजही आपण देवाला या ना त्या प्रकारे साकडे घालतो. नमस्कार करून मंदिरात ११ रुपये चढवतोच (अरेच्चा IPOसाठी पण पोस्टात ११ रुपये घेतात म्हणे) तेव्हा RTI ची ही कल्पना केवळ institutionalization म्हणता येईल. एकंदरीत आपल्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या नको नको त्या विचारांना याRTI द्वारा वाट मोकळी करून आपल्याला पुन्:ष्च् हरिओम करण्यासाठी ही देवाला RTI मध्ये ओढण्याची कल्पना जबर आहे.
(प्रेरणास्थान: आपण RTI मध्ये कोणाकोणाला प्रश्न विचारुन आपल्याइतकेच हैराण करू शकतो असे विचार करण्यास भाग पाडणारे उ.प्र. विद्युत विभागात काम करणारे सर्व कर्मचारी)
(तळटीप: RTI activists आणि विजीगीषू अभ्यासकांना नम्र विनंती की RTI Act मध्ये प्रश्न नाही तर माहीती मागता येते असा technical अभिप्राय देण्याचा मोह आवरला तर जस्तीत जास्त रसिकांपर्यंत ही कल्पना पोहचू शकते)