तीनात चार, सातात आठ !


गेल्या  खेपेला मुंबई  लोकल मध्ये मला जबर धक्का बसला. म्हणजे धक्के बसल्याशिवाय लोकलचा प्रवास होऊच शकत नाही हे खरंच ! पण एके काळच्या ९:००ची fast पाकडणाऱ्या मला आता मध्येही शिरता नाही आले  आणि मी स्टेशनवर बॅगेतल्या पाण्यासकट सांडलो . कसाबसा क्षणार्धात सावरून चढल्यावर मग विचार आला हे झालं कसं ? यापेक्षा  लई गर्दी झेललीये मी. लगेच उमगलं  मेट्रोची सवय भोवली. 

महानगरांची तुलना हा माझा आवडता  विषय. मुंबई-दिल्ली अधिकच . कारण  दोन्ही  ठिकाणचा दीर्घ  आणि पाहिल्याहाती अनुभव. त्यातल्यात्यात Public Transport  म्हटलं  म्हणजे  तुलनेत  साम्यभेद  अगदी  प्रकर्षाने जाणवतात . 

मुंबई लोकल म्हणजे  वेळापत्रक ! ७:१२ ची सुटली तर पुढची fast ७:२६ ला हे अगदी  अबालवृद्धांना पाठ ! त्यानुसार दिनचर्या ठरलेली . इतकेच काय तर जागाही ठरलेल्याच .दिल्ली मेट्रोचं  मात्र तसं नाही. एक गेली तर पुढली ००:०२ मिनिटांनी हेच तेवढं कळतं . वेळापत्रक असलं तरी ते कुणी पाहिलेलं नसतं . मुंबई-दिल्ली चा मूलभूत फरक हा इथे दिसतो . घड्याळाच्या काट्यावर नाचणारा माणूस दिल्लीत आला की आळशी बनतो  आणि  दिल्लीकराला मुंबईचा वेग सहन न झाल्याने तो  परत उत्तरेकडे  धूम ठोकतो . 

दिल्ली-मुंबईचा फरक फलाटावर पण ओळखता येतो. कुठलेही  चिन्ह / arrow  नसताना डब्ब्यात शिरण्यासाठीची मुंबईसारखी शिस्त दिल्लीत  नाही. पिवळे निळे  निरनिराळे चिन्ह असली  तरीही त्यांना पायाखाली तुडवत सज्जन लोक मेट्रोत चढण्याचा हक्क बजावतात. तुडूंब भरलेल्या लोकलमध्ये लटकणाऱ्या कवायतखोरांमागे अजून किती जागा आहे हे उमगायला एक-दोन आठवड्याचा प्रवास पुरेसा असतो. मग कळतं ही जागा डब्यात नसून मुंबईकरांच्या हृदयात आहे. कितीही गर्दी असू देत लोकल प्रत्येकाला  सामावून घेतेच. दिल्लीच्या मेट्रोमध्ये  पारदर्शी दरवाज्या खिडक्यांमागे किती जागा आहे याचा अंदाज लगेच बांधता येतो. फलाटावर येणारी मेट्रो पाहताच जर रिकामी seat  दिसलीच  तर मग निळ्या पिवळ्या चिन्हाची  जी पायमल्ली होते तिचा हिशोब नाही. मेट्रोत  लोकलप्रमाणे  कवायतखोरांना  संधी नसली तरी दरवाजा उघडताच  वेगवान दबंग बाहेर पडतात. आतल्या डोळ्यांना  बाहेरच्या  आणि बाहेरच्या डोळ्यांना आतल्या जागेचा शोध  असतो. ही सळमिसळ दरवाजा  बंद  होईस्तोवर  चालते. कित्येकदा तर मला प्रश्न पडतो तो driver  काय ठरवून हे दरवाजे बंद करत असेल? म्हणजे लोकलप्रमाणे  घड्याळातला  सेकंद काटा पाहून की लोकांना सामावण्याची  क्षमता पाहून?

एकदा प्रवास सुरु झाला की मुंबईकरांच्या  घामेजलेल्या अंगाला धावत्या लोकलमधील  हवेची  झूळुक  गार करून सोडते. दिल्लीकरांना  हे सुख मेट्रोतले  AC  देते. किंबहुना हेच AC या प्रवासातले  मुख्य आकर्षण  बनते. कळत  वा नकळत ! मग सुरु होतात अबोल विनंत्यांचे  अर्ज! समजा कुणी lucky असेलच तर त्याला लोकलमध्ये तीन सीटवर चौथ्या जागेसाठी उमेदवारी मांडता येते. आणि जागा मिळते पण! मग अर्धा पार्श्वभाग  टांगता ठेवत डुलकी घ्यायला मोकळा ! मेट्रोत मात्र सातची सीट असते. टी पण दोन्ही बाजूंनी  बंदिस्त . म्हणजे सातवर आठवा यायचा झालाच  तर सीटवर नाही त्याला हृदयात जागा द्यावी लागते  आणि आश्चर्य  म्हणजे दिल्लीकराला हे मेट्रोने यशस्वीपणे  शिकवले. स्त्रियांसाठी /वृद्धांसाठी  जागा देणे हा शिष्टचार दिल्लीकराला आत्मसाद करणे भाग पाडले या मेट्रोने. 

Public Transport  मध्ये आत कसं  वांगायचं हे मुंबईकर बाहेर शिकतो आणि बाहेर कसं वागायचं हे दिल्लीकर आत शिकतो!
 

Latest Post

Pluribus हमारे राम

गेल्या आठवड्यात दोन अचाट कलाकृती पाहिल्यात . एक Apple TV वर तर दुसरी रंगमंचावर ! आणि आता दोन्ही माझ्या मनात आपापल्या जागेसाठी भांडत आहेत . ...