मी एक वादळ
संतप्त पाण्याच्या शब्दांना प्रसवणारं
सीमाहीन संकुचित सागराच्या रागाला ऐहिकरूपात बदलणारं
मी वादळ
सारं सामावून घेणारं
पृष्ठभागावरून स्वत:भोवती
गिरकी घेत हवेलाही वजन देणारं
मी वादळ सर्व हलवून टाकणारं
मनातल्या समाधानाच्या डोंगरांना पार करणारं
नुकतंच जन्मलेलं पण अगणित
काळापासून कालचक्राच्या साक्षी असणाऱ्या
सागराला भयंकर रूप देणारं
मी वादळ अहंकारी
मी वादळ पृथ्वीच्या कणांनाही
स्वत:च्या केंद्राभोवती फिरवणारं
मी वादळ उर्जेच भुकेलं
मिळेल त्याला तुडवून त्यातलं
सारं शोषून घेणारं
स्वत:च्या झंझावातात विध्वंस ओढवणारं
मी वादळ जगाला विसरून
आत्मकेंद्री बनलेलं
मी वादळ मोठाल्या झाडांना
मुळासकट उपटणारं
पण शेवाळ्यासमोर हात टेकलेलं
मी पणाच्या सर्वोच्च आविष्कारापासून
क्षुद्रपणासमोर लोटांगण घालणारं
मी एक वादळ ...
नुकतंच विरलेलं.