केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) पूर्व परीक्षा नुकतीच पार पडली. देशाच्या कानाकोपºयाातून अनेक उमेदवारांनी मुख्य परीक्षेच्या तयारी साठी अथवा पुढल्या वर्षीच्या परीक्षेसाठी दिल्लीकडे कूच केली. यूपीएससीची पंढरी मानल्या जाणाºया दिल्लीते असे अनेक डेरे आहेत जेथे हे उमेदवार वास्तव्य करण्यात धन्यता मानतात. या ठराविक परिसरांत यूपीएससीे अनेक क्लासेस चालतात. अशाच राजेंद्र नगरात परवा जाण्याचा योग आला. महाराष्ट्रातल्या एका नातेवाईकास घेऊन मी तेथे गेलो. हा नातेवाईक बायकोचा भाऊ असल्याने मी अधिक जिज्ञासूवृत्तीने त्याच्यासाठी विचारपूस करू लागलो.
पंधरा वर्षांपूर्वी मी देखील असाच दिल्लीत धडकलो होतो. आज राजेंद्र नगर वेगळेच वाटत होते. जेथे पाहतो तेथे क्लासेसच्या जाहिरातीच जाहिराती. ( असं म्हणण्याची पद्धत खास दिल्लीचीच) गल्ली बोळाचा आणि प्रत्येक स्केअर फूट जागेचा सुयोग्य उपयोग येथे केलेला आढळतो. जाहिरातींचे नानाविध प्रकार सापडतात. भिंतीवरील, फलकावरील, इमारतीच्या माळ्यावरून लटकलेली सुरकुत्या पडलेले पोस्टर, पॉम्फलेट वरील रंगबेरिंगी, यशस्वी उमेदवारांचे नीटनेटके फोटो असलेल्या अनेक जाहिराती. यात एलईडीवरील जाहिरात लक्ष वेधते. सहजच मनात आले, कागदावरच्या जाहिरातींचा प्रवास आता प्रगल्भ झाला आहे. सनदी सेवेकडे कल असलेला कोणीही इथे आला तर तो तावडीतून निसटता नये- याची खबरदारी चहावाल्यापासून मोठ्या दुकानापर्यंत जवळजवळ प्रत्येक जण घेत असतो. असाच अनुभव आला.
आम्ही एका चहा वाल्याकडे गेलो. पंधरा वर्षांपूवीचा ५ रुपये स्पेशल आता १० रुपये 'चालू' चहा झाला होता. त्याला सहजच विचारले कि अमूक-तमूक विषयासाठी असणारा क्लास कुठे आहे? त्याने केवळ पत्ताच नाही सांगितला तर त्यासाठी नोट्स कुठे मिळतील, कुठे राहावे, असे सगळे ताळेबंदच सांगायला सुरुवात केली. आम्ही लगेच पळ काढला.
राजेंद्र नगर आणि तत्सम परिसराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारी छायाचित्रणाची (फोटोकॉपी) दुकाने. मला वाटते फोटोकॉपीपेक्षा अधिक संक्रमण कोणत्याही नवीन संकल्पनेने शिक्षणक्षेत्रात केले नसावे. इथे त्याचा जास्तच प्रसार आहे. राजेंद्र नगरात एखाद्या मध्यम आकाराच्या पुस्तकांच्या दुकानाला लाजवेल अशी मोठ्ठाली फोटोकॉपीची दुकाने आहेत. विदेशी न परवडणाºया पुस्तकापासून क्लासेसच्या लिखित नोटसपर्यंत सर्व काही येथे मिळते. एखादे मासिक खर्चिक वाटले तर या 'छापखान्या'त हवे त्या मासिकातल्या हव्या त्या लेखांची छायाचित्रित प्रत उपलब्ध होऊ शकते. हे म्हणजे अचाटच! आमचा मोर्चा मग क्लास कडे वळला.
एका प्रसिध्द क्लासचे आॅफिस गाठले. पाहतो तर काय तिथे तोबा गर्दी! मोठ्ठी रांग! विचारल्यावर कळले की नवीन बॅचसाठी टोकन मिळत आहेत. बँंकेनंतर टोकनचा (आणि ते घेऊनही रांगेचाही) होणारा इतका कार्यक्षम वापर इथलाच. क्लासेसची फी चौपट वाढलेली. लाख दीड लाखांमध्ये क्लासवाले एक बॅच दहा महिन्यात उरकावातात. आणि एका वर्गात पाचशे विद्यार्थी ! 'हे असंही असतं?', माझ्या शालकाला भोवळच आली. सनदी सेवेत प्रवेशुच्छुकांचा जणू हा विकतचा कारखानाच वाटावा!

अशा कोण्या एका कारखान्यात प्रवेश मिळाला की मग उमेदवारासाठी पुढचे आव्हान म्हणजे राहण्याच्या जागेचे! ये-जा करण्याचा वेळ वाचावा, अभ्यासाचे वातावरण मिळावे म्हणून इथे हे राहतात. पण काय किंमत मोजावी लागते? इथे बºयाचदा खोलीनुसार नाही तर बेड नुसार पैसे आकारले जातात आणि ते देखील अव्वाच्या सव्वा! स्केअर फूटचा विचार केला तर याची तुलना नरीमन पॉईन्टशी व्हावी. बरं, इतके असूनही खोलीत सोयींच्या नावाने शंख! खेळती हवा आणि सूर्यप्रकाश दुर्मिळ. इतर सोयी विचारायलाच नकोत. बिनचूक निरीक्षण केल्यावर कळले की घर भाड्याने देणे हेच मुख्य उपजिवीकेचे साधन झाले आहे. त्या अनुषंगाने, येथील अर्थकारण विनाकारण महागडे झाले आहे. त्याची झळ कित्येक होतकरु विद्यार्थ्यांना बसते आहे याची जाणीव नाही त्यांना. तरी उमेदवारांची उमेद काही कमी होत नाही. आधीही उमेद होतीच पुढेही राहिल.
'आउटलायर्स' या पुस्तकात '१०,००० अवर रूल' सांगितला आहे, त्यानुसार प्रत्येक कामात यशस्वी होण्यास १०००० तास देणे , मेहनत करणे गरजेचे असते. राजेंद्र नगर मध्ये आले आणि इथल्या परीक्षार्थींकडे पहिले कि कळते त्याना हे दहा हजार तास वर्षभरातच पूर्ण करण्याची घाई असते . त्यासाठी ते काहीही किंमत मोजायला मागे पुढे पाहत नाहीत. आणि गम्मत म्हणजे पूर्व परीक्षेच्या अधिसूचने पासून मुलाखती पर्यंत साधारण १४ महिने लोटतात- म्हणजे १०००० तास!
(लेखक केंद्र शासनात सनदी अधिकारी आहेत)