नुकतेच
सरकारने गणेशोत्सव विषयी भरमसाठ नियमांची जंत्री जाहीर केली. यामध्ये मंगलमूर्तीची उंची, एकावेळी एकत्र येणाऱ्या भाविकांची संख्या या विषयी बंधने
सांगितली आहेत. हे नियम केवळ
सार्वजनिक गणेशोत्सवासाठीच नाही तर घरगुती गणपतीसाठी सुद्धा लागू आहेत. कदाचित आजच्या वाचक पिढीच्या आयुष्यातील हा असा
पहिलाच गणेशोत्सव असावा. खरंतर गणेश
चतुर्थी हा सण मराठी मनाच्या जिव्हाळ्याचा आहे. त्याला कोणी अशी बंधने घालून देणे मुळातच न पटण्यासारखे आहे. यंदाचे वर्ष
मात्र सर्वपरिने निराळे आहे. जणू बाप्पा नेच ही बंधने आपल्यावर घालून दिलेली आहेत
साधारणतः
वीसेक वर्षांपूर्वी पुण्यात
इंजिनिअरिंग करत असताना गणपती उत्सवात आम्ही धमाल करायचो. हॉस्टेल मधली आम्ही कार्टी दर
रात्री अगदी न चुकता कंपू कंपूत गणेशाची आरास बघायला जात असू. अगदी शिस्तीत प्रत्येक गल्लीबोळात जाऊन वेगवेगळ्या गणेश
मंडळांना आम्ही भेट द्यायचो. मग या
गणपतीची प्रकाशयोजना भन्नाट,
त्याची संकल्पना अचाट यावर जोरदार
चर्चा चाले. यंदा मात्र
असे अनुभव कुणाला येणार नाहीत. गणपती
हे असे दैवत आहे ज्याला आपण आपल्या जवळचे मानतो. त्यामुळे आपला हा
आपलेपणा आपण गणेशोत्सवाच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये सजवून साजरा करत असतो. `
गणेशोत्सवात
मंगलमूर्ती आणि त्यासोबतचा देखावा या दोन
गोष्टी भिन्न भिन्न नसतात. त्यांची एकरूपता
प्रत्ययास येते. मला
आठवते लहान असताना गावी एक गणेश मंडळ अत्यंत प्रसिद्ध होते. त्याचे कारण म्हणजे येथे गणेश मूर्ती स्वयंचलित रुळांवर बसून
पडद्यामागे जाई आणि दुसरीकडून बाहेर आल्यावर मूर्तीच्या हाती भाविकासाठी मोदकांचा
प्रसाद असे. हा गणराय असो अथवा अगदी गेल्यावर्षी पाहिलेला PUB-G च्या सोल्जर च्या रूपातला गणपती असो, बाप्पा
नेहमीच भक्ताच्या मनातले ओळखून असतो. हे या
गणेशोत्सवाच्या सादरीकरणातून नेहमी प्रकट होत आले आहे. त्यामुळे
यंदाच्या वर्षी जर कोणी मंडळाने आपल्या देखाव्यात परदेशी मोबाईल ॲप्सवर घातलेली
बंदी दाखवून देशभक्ती साजरी केली असती तर नवल वाटायला नको.
गणेशोत्सवा
मधील आरास नेहमीच राजकीय, सामाजिक प्रश्नांपासून
अगदी वैयक्तिक द्वंद्वा
पर्यंत सर्व दाखवते. येत्या वर्षी गणपतीची आरास काय करायची त्याची तयारी दोनेक
महिने आगाऊ चालते. मंडळ असो वा
घरचा गणपती - तो बसणार कुठे, देखाव्याला
किती जागा, पार्श्वभूमी
काय अशा अनेक पैलू मधून याचे नियोजन चालत असते. त्याअन्वये मूर्तीची किती उंचीची, कशी असावी यावर देखील विचार
होतो सुशोभीकरण आत लुक झुक करणाऱ्या
दिव्यांची देखील ध्रुवाची जागा असते. अगदी
घरातील जपून ठेवलेली वा नव्याने
आणलेली दिव्यांची माळ पण बाहेर निघते. 1962 किंवा कारगिल अशा युद्धांची कथा आणि ध्वनि
वर्णने पुण्यात गाजलेली स्मरतात. एखाद्या
राजकीय नेत्याच्या जीवनातील सुरस कथा देखील इतक्याच चपखल रितिने
अनेक गणेश मंडळ दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. यंदा मात्र हे असं होईल असं वाटत
नाही.
कोरोना महामारीने आपले जग उलटसुलट करून
टाकले आहे. सणासुदीचे
दिवस पहिल्यासारखे राहिले नाहीत. एकंदर
सामान्य मान्यताच या सावटात खाली डोके वर पाय अशा झाल्या आहेत. एरवी बाजारात कोणी मास्क लावलेला दिसला तर तो
परदेशी असे नाही तर कोणी रोगी वाटे.
आपल्याशी बोलताना जर कोणी मास्क लावले
तर ते गुर्मीष्ठपणाचे भासे मात्र आज कोणी मास्क लावला नसेल तर आपण त्याच्या जवळ जाण्याचेही टाळतो, सोशल डिस्टंसिंग ही पाळण्याची काळजी घेतो. एकंदर या संकटाने आपण काळजी घ्यायचे शिकलो असे म्हणता येईल मग ती स्वतःची असो, आप्तांची असो व
पर्यावरणाची असो! लॉकडाऊन नंतर
पर्यावरणात सर्वत्र सकारात्मक बदल पाहायला मिळाला.
दिल्लीवासीयांनी पहिल्यांदाच इतकी स्वच्छ हवा आणि यमुनेचे स्वच्छ पाणी पाहिले. अशा परिस्थितीत विचार केला तर वाटते सार्वजनिक
गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी आपल्याला बाप्पा नेच कोरोना
नावाचा धडा दिला असावा.
आपण
संकटात सापडलो म्हणजे देवाची धाव घेतो आणि यासाठी किंबहुना कोणाचा कोणता देव हे पण
ठरलेले असते. मात्र गणेश
एकच असा देव असा आहे जो
लहान थोरांना समान जवळचा वाटतो.
बाप्पा गणराया गजानन अशा अनेक नावांनी श्रद्धाळू परमेश्वराची आराधना करतात. याच उत्साहात गणेश उत्सव देखील
थाटात साजरा होते ज्यामध्ये आबालवृद्धांचा सक्रिय सहभाग असतो मग तो गणपती मंडळातला
असो अथवा घरातला. घरी कोणी आलेच तर तो मास्क लावून येतो याचे निरीक्षण केल्यावर माझ्या लहानगीने मला विचारले, “आपल्याकडे
बाप्पा पण मास्क लावून येणार का यावर्षी?”
तिचा
प्रश्न निरागस असला तरी सहजच मनात विचार आला की आपण सर्वच ह्या संकटामध्ये योग्य
गोष्टी करण्याचे शिकलो आहोत.
यामध्ये वर म्हटल्याप्रमाणे काळजी
घेणे तर आहेच पण त्यासोबतच
जुजबी संसाधनात आपल्या
जीवनाचा संच बसवणे, वायफळ खर्चांना फाटा देणे अशा अनेक गोष्टींचा
समावेश होतो, खरंतर ही यादी
खूप लांबलचक होईल. येत्या
गणेशोत्सवामध्ये आपण बाप्पाला त्याने दिलेल्या ह्याच प्रसादा करिता धन्यवाद देऊयात.
अमित भोळे
(सदर लेख आज गणेश चतुर्थी 22 ऑगस्टला महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित झाला. )

