आपण
जेव्हा एखाद्या मंदिरात जातो किंवा for that matter कोणत्याही श्रद्धा स्थानाला भेट देतो. मग ते चर्च असो, मसजीद, गिरिजाघर अगदी काहीही असो, भक्ताची
काय अपेक्षा असते? 2-4
ठळक गोष्टी असतात. एक, आपल्याला आपल्या प्रार्थना शांतचित्ताने करता याव्यात. दोन,
रोजच्या ज्याच्या त्याच्या जीवनातील कच-कच, मच-मच आणि कट-कट यांपासून क्षणभर विश्रांती मिळून आपला
संपर्क त्या सर्वोच्च शक्ती सोबत होण्याकरिता पूरक वातावरण मिळावे. तीन, आपला
भक्तिमार्ग आणि आपल्यासोबत आलेल्या इतर भक्तांचा मार्ग यात चढाओढ नसावी. ते होऊ
नये आणि आजच्या करोनानूभावाच्या काळात एक नवीन गोष्टीचा समावेश म्हणजे श्रद्धा
स्थानाची भेट कोविड अप्रोप्रिएट एन्व्हायरमेंट मध्ये व्हावी. काल मी सपत्नीक श्री
क्षेत्र शेगाव येथे श्री गजानन महाराज मंदिराला भेट दिली आणि ठामपणे वरील सर्व
गोष्टींच्यासमोर बरोबरची खूण करू शकतो.
महाराजांचे
दर्शन करोना संक्रमणाचे कारण होऊ नये म्हणून ट्रस्टने दर्शनासाठी मोफत ऑनलाइन
पासची व्यवस्था सक्ती केलेली आहे. तो मिळवायचा असेल तर आधार कार्ड, मोबाईल इत्यादी
माहिती भरून वेळेचा स्लॉट नक्की करता येतो. यामुळे एकूण भक्त संख्या, दर तासाला दिले जाणारे
प्रवेश, महाप्रसादाचे नियोजन यांवर नियंत्रण ठेवता येते. तसेच शासनाच्या नियमावलीचे पालन करण्यासाठी मदतच
होते. ऐनवेळेस e-पास
ची प्रिंट घेऊ शकलो नव्हतो तेव्हा काही अडचण तर होणार नाही अशी भीती होती. मात्र
प्रवेशद्वाराच्या सेवाधारकाच्या वागणुकीत काहीही बदल झाला नाही. त्याने आमचे
क्रेडन्शियल्स फोनच्या स्क्रीनवर तपासले आणि आमचा प्रवेश सीमलेस झाला.
गाभाऱ्यातून
समोर आपण महाप्रसादाचा कडे जातो. जागोजागी दिशादर्शनासाठी पाट्या आणि
सेवाधारी उभे असल्याने चुकायचा प्रश्नच
नाही. महाप्रसाद हॉल १ कडे निघालो. सेवाधाऱ्याने हातांवर साबणाचा वर्षाव केला आणि ‘बेसिन
मध्ये हात झटका’ असेही सांगितले. बारीक पाण्याची धार तिथेही होती. मग हॉलमध्ये
जमिनीच्या एका चौकटीतून दुसऱ्या चौकटीत जात आम्ही ताटांजवळ पोहोचलो. पलीकडची सेवाधारी व्यक्ती
मास्क आणि
ग्लोज घालून होती. ताट हातात घेतले. चपलांना हात लावला होता नंतर थेट ताटालाच! मध्ये चार वेळा सॅनिटायझर आणि दोन
वेळा हात धुतलेले!! मध्ये कशालाही स्पर्श करायची गरजच नव्हती!!!
महाप्रसाद म्हणजे भोजन. त्यामध्ये वरण,पिठले,फळ भाजी, भात, मसाला भात,
पोळ्या आणि बुंदीचे लाडू. बसण्यासाठी ठराविक जागा. बेंच सारखं स्टील स्ट्रक्चर. त्यावर तीन जणांना बसण्याची सोय. आजूबाजूच्या
जागांवर फूल्या आणि केवळ मधल्याच जागेवर बसण्यासाठी सुचवलेले. अशा शिस्तबद्ध पद्धतीत आम्ही नवरा बायको
जवळ जवळच्या दोन बेंचवर दूर-दूर बसलो. बेंचवर पाण्याचा पेला सांडू नये म्हणून
त्यासाठी गोल छिद्र करत त्याला खालून सपोर्ट देत सोय केली होती. मधून मधून मास्क ग्लोजधारी सेवाधारी काय हवं, काय नको यासाठी
विचारपूस करत होती. महाप्रसाद ताटात ठेवू नये या सूचना जागोजागी लिहिलेल्या आहेत. महाप्रसाद अगदी
घरच्यासारखा पोट भरून तृप्त झाले. संपताच आपापले ताट ठराविक ठिकाणी ठेवून आम्ही पाय-चलित
नळाच्या बेसिन जवळ पोहोचलो. रस्त्यात सेवाधाऱ्याने साबण दिलाच होता. हात धूऊन आम्ही रांगेत बाहेरच्या दिशेने
निघालो. एरवी महाराजांच्या पादुकांजवळ ध्यानासाठी भक्त बसायचे, कोरोना काळानंतर ते कक्ष बंद केले गेले. आता ‘निर्गमन’ पथावर चौकटीत खुर्च्या ठेवून
व्यवस्था आहे. तिथे तीन-चार देणगी खिडक्या होत्या त्या प्रत्येक कक्षातला सेवाधारी
माइक स्पीकर च्या साह्याने संभाषण करत होता. मी देणगी दिल्यावर त्याने पत्ता विचारला. मी दिल्ली सांगितले आणि पावतीची वाट
पाहत होतो. पण
त्याने विचारले महाराष्ट्राचा पत्ता नाही का? कंप्यूटर दिल्ली घेत नाहीये. मी चमकलो आणि मग महाराष्ट्रातला पत्ता
दिला.
समोर चपला स्टँड जवळून चपला घेतल्यावर हात
धुण्यासाठी बारीक धार होतीच. जवळच वाड्मय विभागाचा फलक पाहिला. तेथून सौं.नी
विजय ग्रंथ आणि प्रार्थना स्तोत्र घेतली. विशेष म्हणजे त्याची किंमत स्वेच्छेने
द्यावयाचे होती.
आम्ही मग संतुष्ट मनाने बाहेरच्या मार्गाकडे वळलो. सेवाधारी, पायांजवळची चौकट आणि पाट्या
सोबतीला होत्याच. मग जाणवले अरे, सेल्फी तर राहिलाच मग खिशातून फोन काढून फोटो काढला. “माऊली पुढे चला फोटो काढू नका” सेवाधारी बोलला. आजच्या सामाजिक मनाला सेल्फी पॉइंट मंदिरातही हवा असतो,
नाही का? आनंदी अनुभव आणि शिस्तबद्ध सुटसुटीत कारभार यामुळे हे दर्शन विशेष ठरले. आधी मी दोन वर्षांपूर्वी दर्शनासाठी
आलो होतो.
तेव्हा शिस्त होती,सेवाधारी यांचे समर्पण होते, मात्र यावेळी ते अधिकच जाणवले. सेवाधाऱ्यांच्या
निस्वार्थ सेवेला सलाम! कदाचित
त्यामुळेच का काय माझा असा विश्वास आहे की इथे येणाऱ्या भक्तांपैकी 90 टक्के तरी रिपीटर असावे.
मी
देव देव करणारा आहे अशी माझी ओळख नाही. पण मला ओळखणाऱ्यांना माहित आहे की मी believer आहे म्हणजे मानवाच्या आकलना
पलीकडच्या शक्तीमध्ये विश्वास
असणाऱ्यांपैकी एक ! त्या शक्तीशी एकरूप होताना जी चित्त शांतता हवी ती श्री क्षेत्र
शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या मंदिरात मिळाली.
अमित भोळे
(सदर लेख दैनिक हिंदुस्तान च्या अमरावती आवृत्तीत दि. १६ नोव्हेंबर , २०२१ रोजी प्रकाशित झाला.)
